22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रमध्यान्ह भोजनात मसाले भात, व्हेज, अंडा पुलाव

मध्यान्ह भोजनात मसाले भात, व्हेज, अंडा पुलाव

शालेय पोषण आहारात १२ पाककृतींचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या मध्यान्ह भोजनात व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, अंडा पुलाव सोबतच गोड खिचडी, नाचणीचे सत्व मिळणार आहे. या पूर्वी दिल्या जाणा-या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात १२ प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच ६ वी ते ८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच तांदळापासून बनविलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.

तथापि, या आहारात बदल करून गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना ३ संरचित आहार पध्दतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करण्यात आला; परंतु हा आहार देताना विविध अडचणी येत असल्याबाबत निवेदने प्राप्त झाली होती. त्यानुसार आहार पध्दतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आहेत १२ पाककृती
नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात व्हेजिटेबल पुलाव, सोयाबीन पुलाव, मसाले भात, मसुरी पुलाव, मटार पुलाव, मूग-शेवगा वरण भात, मूग डाळ खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ, चवळी खिचडी, अंडा पुलाव, चणा पुलाव, गोड खिचडी व नाचणी सत्व अशा १२ प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला.

साखरेसाठी निधी नाही
नव्या पोषण आहारात अंडा पुलाव गोड खिचडी, नाचणी सत्व हे पदार्थ पर्यायी स्वरुपात दिले जाणार आहे, असे स्पष्ट केले. मात्र गोड खिचडीसाठी लागणारी साखर लोकसहभागातून मिळवावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR