17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी बँक सदावर्तेंमुळे अडचणीत

एसटी बँक सदावर्तेंमुळे अडचणीत

श्रीरंग बरगे यांचा आरोप

मुंबई : एसटी बँक ही राज्यभरातील ६२ हजार कर्मचा-यांच्या कष्टाच्या पैशातून उभी आहे, पण सदावर्तेंच्या हुकूमशाहीमुळे आणि राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे ती अडचणीत आल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. सदावर्तेंच्या पॅनेलची सत्ता असलेल्या एसटी बँकेचे नवीन संचालक व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे.

बँकेचा सीडी रेशो वाढून तो ९५ टक्क्यांच्या वरती पोहोचला आहे. एसटी बँक मोठी आहे, तिचे राज्यभरात ६२ हजार सदस्य आहेत. एसटी कर्मचा-यांच्या कष्टाच्या पैशाने ही बँक उभी राहिली आहे. गुणरत्न सदावर्तेंची हुकुमशाही याला जबाबदार आहे. राजकीय लाभ व्हावा याचा प्रयत्न त्यांनी केला. सदावर्तेंना व्यवस्थपकीय संचालकाचा कोणताही अनुभव देखील नाही. अनुभव नाही ही गोष्ट नियमाला देखील धरुन नाही.

बँकेचे व्यवहार गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. डिपॉझिटच्या प्रमाणात कर्ज द्यायचे असते, मात्र तो डोलारा सांभाळला गेला नाही. संचालक मंडळातील सदस्य पुढे आले असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय बँकेच्या हिताचा आहे. त्यांना हे करण्यासाठी प्रोत्साहन दिले यांचे देखील अभिनंदन करतो. आनंदराव अडसूळ यांच्या संघटनेकडून आरबीआय आणि सहकार खात्याला अनेक तक्रारी केल्या गेल्या. पण सरकारने वेळकाढूपणा केला. त्यामुळे बँकेच्या अडचणीत वाढ झाली. हे आधीच सहकार खाते आणि आरबीआयसमोर आले असते तर बँकेच्या अडचणीत वाढ झाली नसती.

नवे संचालक मंडळ सदावर्तेंच्या कार्यप्रणालीवर नाराज
सदावर्तेंच्या पॅनलची सत्ता असलेल्या एसटी बँकेच्या म्हणजेच द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बँकेचं जे नवं संचालक मंडळ आहे, ते बँकेत सुरु असलेल्या कारभारावरुन व्यवस्थापकीय संचालकांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बँकेचे व्यवस्थापकीय संचालक हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.

अभ्युदय बँकेपाठोपाठ आता सदावर्तेंच्या पॅनेलची सत्ता असलेली द स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकही अडचणीत येण्याची शक्यता आहे. नवं संचालक मंडळ आल्यापासून ४६६ कोटींच्या ठेवी काढल्या. बँकेचा सीडी रेशो ९५ टक्क्यांच्या वर गेलाय. त्यामुळे अडचणीत वाढ होणार आहे. सर्वसाधारण को-ऑपरेटिव्ह बँकेचा सीडी रेशो ६० ते ७० टक्क्यांमध्ये पाहायला मिळतो. सीडी रेशोत अजून वाढ झाल्यास बचत खात्यातील पैसे काढण्यावर देखील मर्यादा येऊ शकतात. राजीनामा दिलेल्या आणि एसटीमधून निवृत्त झालेल्या अंदाजे ३ हजार सभासदांची देणी पैसे नसल्याने मिळालेली नाहीत असा काही सभासदांनी आरोप केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR