28.2 C
Latur
Wednesday, May 7, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?

एसटी कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?

मुंबई : एका अपहाराच्या घटनेवरून एसटीच्या सर्व वाहकांना संशयाच्या कठड्यात उभे करून वेठीस धरणे हा केवळ मूर्खपणा आहे. तसेच अपहार रोखण्यासाठी कर्तव्यावर असणा-या महिला कर्मचा-यांच्या खिशात हात घालून झाडझडती घेण्याचे उद्दाम परिपत्रक काढणा-या अधिका-यांना वरिष्ठांनी ताबडतोब समज द्यावी अन्यथा प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचा-यांचा अशा उद्दामखोर परिपत्रकामुळे उद्रेक होऊन त्याचा परिणाम आंदोलनामध्ये होईल, व तशी वेळ आणू नये, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
इस्लामपूर(सांगली जिल्हा) आगारांमध्ये एका वाहकाने अँड्रॉईड मोबाईलमध्ये अ‍ॅप तयार करून त्याद्वारे तिकिट विक्री करून अपहार केला व त्याद्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवण्याचा प्रकार घडला, ही घटना दुर्दैवी आहे.

पण अशा घटनांमधून एसटीच्या तांत्रिक यंत्रणेचा दोष दिसून येत आहे. एसटीच्या मध्यवर्ती संगणकीय कक्षाचे तिकिट विक्री मशिनवर नियंत्रण असताना असा प्रकार त्यांच्या लक्षात का आला नाही? त्यांना विचारणा करण्याऐवजी राज्यातील सर्व एसटी वाहकांची तपासणी करावी, किंबहुना महिला वाहकांचे खिसे तपासावेत असे तुघलकी फर्मान वाहतूक विभागाच्या अधिका-यांनी काढले आहे.

अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे काम करणा-या महिला वाहकांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. आणि भविष्यात आपल्या कामगिरीबद्दल नैराश्य निर्माण होऊन त्यातून कर्मचा-यांमध्ये उद्रेक निर्माण होऊन पूर्वी साडेपाच महिने संपात होरपळलेल्या एसटीला आणखी एका मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अशा बेजबाबदारपणे परिपत्रक काढणा-या अधिका-यांना वरिष्ठांनी समज द्यावी, असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR