मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुक्षा विधेयकाच्या विरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, माकप, भाकप, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आज बुधवारी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भीती आहे. नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत. त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, तुरुंगात टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून १० सप्टेंबर आणि त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.