बीड : प्रतिनिधी
बीडमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीमुळे जे काही नुकसान झाले, त्या नुकसानीची पाहणी पंकजा मुंडे यांनी आज केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना बीडमध्ये जी घटना घडली, हे राज्य पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले. त्यामुळे अंतरवाली येथे झालेला लाठीचार्ज असो की बीडमध्ये झालेली दगडफेक आणि जाळपोळ, या दोन्ही घटनांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
विरोधकांकडून गृह खात्याच्या कारभारावर टीका सुरू असताना आता पंकजा मुंडे यांंनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ३० ऑक्टोबर रोजी बीडमध्ये जेव्हा दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली, त्यावेळी दगडफेक करणारे जे तरुण होते, त्यांना वाचविण्यासाठी अॅम्बुलन्स आणि इतर काही गोष्टी त्यांना तात्काळ मिळत होत्या. ही माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला नव्हती का, असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. इंटेलिजन्स फेल असल्यामुळे हा प्रकार बीडमध्ये घडला असल्याचे त्या म्हणाल्या.