मुुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणा-या एसी लोकलवर ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान दगडफेक करण्यात आली आहे. आज गुरुवारी सकाळच्या सुमारास डोंबिवली आणि ठाकुर्ली दरम्यान अज्ञातांकडून एसी लोकलवर दगड मारल्याने तिच्या खिडकीच्या काचेचे नुकसान झाले आहे. एसी लोकल धावत असताना अचानक दगड मारल्याने या एसी लोकलच्या खिडकीच्या काचेला तडा गेला. या प्रकरणात सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून टिटवाळ्यावरून एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जात असताना ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान एसी लोकलवर अज्ञात समाजकंटकाने दगड मारला. या दगडफेकीत एसी लोकलच्या काचेचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणा प्रवाशाला जखम झाली नाही.
एसी लोकलवरील दगडफेकीची माहिती कळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही एसी लोकलवर दगडफेक करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.