भारतीय चलनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून आयात केलेल्या कच्च्या तेलाचा भरणा रुपयाद्वारे केल्याने आपले चलन जागतिक चलन म्हणून नावारूपास येण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. रशिया- युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्षामुळे सध्या जागतिक व्यापारात बरीच उलथापालथ सुरू असताना भारताने प्रथमच संयुक्त अरब अमिरातकडून खरेदी केलेल्या तेलाचे बिल रुपये चलनातून भरले. एकुणातच आपला रुपया जागतिक चलनाच्या दिशेने जात आहे. या निर्णयामुळे भारत-यूएई यांच्यात केवळ आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले नाहीत तर आंतरराष्ट्रीय आर्थिक आघाडीवर देखील भारतीय रुपयाचे महत्त्व वाढले आहे. अशा प्रकारचा ऐतिहासिक व्यवहार हा भारत-यूएई यांच्यात झालेल्या एका व्यापारी कराराचा परिणाम आहे. या करारानुसारच भारताने कच्च्या तेलाच्या एका खेपेची रक्कम आपल्या चलनातून भरली. यापूर्वी पारंपरिकरीत्या त्याचा भरणा हा अमेरिकी डॉलरने केला जात असे. अर्थात आतापर्यंतच्या पारंपरिक निकषानुसार होणा-या व्यवहारात जाणीवपूर्वक केलेला बदल हे एक धाडसी पाऊल मानले जात आहे. त्याचे जागतिक व्यापाराच्या घडामोडींवर व्यापक परिणाम होणार आहेत.
रुपयात बिल भरण्याचा भारत सरकारचा निर्णय हा चलनसाठ्यात वैविध्य आणण्याच्या व्यापक राष्ट्रीय रणनीतीचा एक भाग आहे. ऐतिहासिक रूपाने अमेरिकी डॉलर हा आंतरराष्ट्रीय व्यापारात नेहमीच प्रभावशाली राहिलेला आहे. त्यामुळे रुपयाचा पर्याय निवडत भारताने डॉलरवरची असणारी अवलंबिता कमी करणे आणि आपल्या चलनाचा वापर वाढविणे या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल टाकले. यूएईशी रुपयांत व्यवहार करण्याची व्यवस्था विकसित करत भारताने जागतिक पातळीवर आघाडी घेतली. सध्याच्या काळात अनेक देश केवळ नवीन आर्थिक सत्ता म्हणून भारताकडे पाहत नाहीत तर रुपया चलनाबाबतही पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘द्विधु्रवीय जगाचे युग आता संपले आहे आणि आता आपण बहुधु्रवीय जगात आहोत.’ या स्थितीत अनेक देश महत्त्वाची भूमिका बजावतील. रुपयांतील व्यवहारामुळे त्याचा केवळ आर्थिक प्रभाव जाणवणार नाही तर भारत आणि यूएई यांच्यातील आर्थिक आणि सामरिक संबंध देखील मजबूत होतील. अशा कृतीतून एकमेकांवरच्या अर्थव्यवस्थेचा विश्वास व्यक्त होतो आणि हे देश पर्यायी चलनाचे उदाहरण म्हणून अन्य देशांसमोर येऊ शकतात. अर्थात या व्यवहारामुळे भारताचा रुपया हा डॉलरजवळ पोचला असा अर्थ निघत नाही. दुसरीकडे अमेरिकी डॉलरने दीर्घकाळापासून जागतिक व्यापारावर प्रभाव टाकलेला आहे आणि सर्वांच्या परकी चलनसाठ्यात ‘फॉरेक्स’मध्ये डॉलरचा वाटा हा सुमारे ६० टक्के आणि जागतिक फॉरेक्स व्यवहारात ८० टक्क्यांपेक्षा अधिक वाटा डॉलरचाच आहे.
अमेरिकी डॉलरसारख्या तिस-या पक्षाच्या चलनात व्यवहाराची अनिवार्यता संपुष्टात आणत भारत आणि यूएई हे व्यवहारातील अनावश्यक खर्च टाळू शकतील आणि विनिमय दरातील चढ-उतारामुळे होणा-या परिणामापासूनही दूर राहतील. अन्य देश देखील अशा प्रकारच्या व्यवस्थेत सामील होण्यासाठी प्रेरित होतील. रुपयाच्या माध्यमातून व्यवहार करताना काही आव्हानांचा देखील सामना करावा लागणार आहे. रुपयांतील व्यवहाराचा आवाका हा अमेरिकी डॉलर किंवा युरोएवढा व्यापक नाही आणि त्याचा डॉलर किंवा युरोवर तात्काळ मोठा परिणाम होईल, असेही नाही. यासाठी रुपयात स्थिरता असणे आणि सक्रिय आर्थिक व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. या बळावरच भारतीय चलनाला व्यापक प्रमाणात मान्यता मिळू शकते. अर्थात आव्हाने असले तरी हे पाऊल नक्कीच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिकदृष्ट्या पारंपरिक व्यवहारात बदल घडवून आणणारा आहे. रुपयाच्या प्रयोगाकडे जागतिक आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास चलनात आणखी वैविध्य येऊ शकतो. रुपया हा एकप्रकारे डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देईल तसेच बहुधु्रुवीय जागतिक व्यवस्थेत योगदानही देईल.
-सीए संतोष घारे