22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे टाळनाद आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे टाळनाद आंदोलन

सोलापूर / प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारल्याने ४ डिसेंबरपासून राज्यभरातील दोन लाख दहा हजार अंगणवाड्या बंद आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळनाद आंदोलन करत ‘ईश्वर अल्ला तेरो नाम सरकार को संमती दे भगवान’ अशी आर्त हाक दिली. संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कांचन पांढरे, सरला चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आंदोलनासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्यात आला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सेविकांना दरमहा २६ हजार तर मदतनिसांना २२ हजार रुपये मानधन देण्यात यावे, मानधनाची निम्मी रक्कम पेन्शन देण्यात यावी, या मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने ४ हजार २०० अंगणवाड्यातील बालकांचा चिवचिवाट तूर्तास बंद आहे.

अंगणवाडी कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून यासंदर्भात राज्यशासन मागण्यांबाबत कोणता निर्णय घेणार, यावर अंगणवाड्या नियमित सुरू होण्याचे भवितव्य अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात ४ हजार २०० अंगणवाड्यांची संख्या आहे. यात २ हजार ९९५ सेविका कार्यरत आहेत. यापैकी १४ अंगणवाडी सेविका ह्या प्रसूती रजेवर गेल्या आहेत. २ हजार ९८१ अंगणवाडी सेविका प्रत्यक्षात संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी मदतनिसांची संख्या २ हजार ४०३ इतकी आहे. यातील २ हजार ३८४ मदतनीस संपात सहभागी आहेत. तर १९ मदतनीस या वैद्यकीय रजेवर आहेत. ८१९ मिनी अंगणवाडी सेविकांपैकी ८१७ मिनी सेविकांनी संपात सहभाग घेतला आहे. तर दोन मिनी सेविका या रजेवर आहेत. तीन ते सहा वर्ष वयोगटातील १ लाख १ हजार बालके हे अंगणवाडीत प्रवेशित आहेत. तर सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटातील १ लाख २ हजारच्या आसपास बालके जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या अधिनस्त आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून संप पुकारल्याने अंगणवाड्यांसह बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे कामकाजही सध्या ठप्प आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके याबरोबरच कुपोषित बालके, गरोदर, स्तनदा माता यांना पोषण आहार पुरवठा केला जातो. मात्र मागील ४ डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने पोषण आहार वाटप विस्कळीत झाला आहे. भविष्यात पोषण आहाराअभावी कुपोषण वाढल्यास त्यास अंगणवाडी कर्मचारी कदापि जबाबदार राहणार नाहीत. यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा याप्रसंगी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR