मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमार्फत राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमांस परदेशी विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दर्शवली आहे. संज्ञापन आणि पत्रकारिता, मानसशास्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य, समाजशास्त्र, कम्पुटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र आणि भाषाशास्त्र अशा विषयांना या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ज्यामध्ये फिजी, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, जपान, पॅलेस्टाईन, मॉरिशस, युगांडा, लिसोथासह १४ देशांतील ६० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बी.ए.एमएमसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी या विद्यार्थीनी प्रवेश घेतला आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून पहिल्यांदाच सर्वाधिक परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विद्यापीठात झाले आहेत. आयसीसीआरच्या विविध योजनेंतर्गत पूर्णपणे अनुदानित शिष्यवृत्तीवर हे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.
यातील बहुतांश ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांत पदवीच्या पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह राहायला उपलब्ध झाल्यामुळे नजीकच्या काळात परदेशी विद्यार्थ्यांची आणखी संख्या वाढेल अशी आशा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्याक्त केली आहे.