डेहराडून : उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्यात गुंतलेल्या टीमला एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. सहा इंच जाडीचा पाइप मजुरापर्यंत पाठवण्यात टीमला यश आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याद्वारे कामगारांपर्यंत अन्नपदार्थ आणि औषधे पोहोचवली जाऊ शकतात. याशिवाय आत अडकलेल्या कामगारांशीही चर्चा करता येईल. नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ( एनएचआयडीसीएल) संचालक अंशु एम खालखो यांनी ही माहिती दिली.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येथे मजुरांना बाहेर काढण्यासाठी काम करणाऱ्या टीमला पहिले यश मिळाले आहे. येथील सर्व टीम गेली नऊ दिवसांपासून प्रयत्न करत होती आणि हीच या टीमची पहिली प्राथमिकता होती. सर्व आवश्यक उपकरणे गोळा करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत सर्व जण बाहेर निघण्याची शक्यता आहे.
बीआरओ उत्तरकाशीच्या बाजूने आणि बरकोटच्या जागेपासून रस्ता बनवत आहे. यंत्रे खूप जड आहेत, ती विमानाने आणता येत नाहीत. त्यांना रस्त्यानेच आणावे लागत आहेत. आता आम्ही फक्त मशीन्सची वाट पाहत आहोत, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक रुहेला यांनी सांगितले की, बीआरओ अप्रोच रोड बांधण्याचे काम करत आहे, जो सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी सकाळी पूर्ण होण्याची शक्यता आहे.