श्रीहरीकोटा : देश झोपेत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इतिहास रचला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुस-या प्रक्षेपण पॅडवरून जीएसएलव्ही-एफ १७ रॉकेटच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह-०५ (ईओएस-०५) चे यशस्वी प्रक्षेपण केले. पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस-०५ ला जीएसएलव्ही-एफ १७ या प्रक्षेपण वाहनाने उप-भूस्थिर संक्रमण कक्ष(सब-जीटीओ) मध्ये अचूकपणे स्थापित केले. हे प्रक्षेपण ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी २ वाजून ५५ मिनिटाला झाले.
ईओएस-०५ हा पृथ्वीपासून सुमारे ३६००० किलोमीटर उंचीवरून फोटो काढणारा उपग्रह आहे. हा भारताचा पहिलाच असा कॅमेरा-उपग्रह आहे जो एवढ्या उंचीवरून फोटो काढेल. हा कॅमेरा एवढ्या उंचीवर असल्याने तो पृथ्वीच्या वेगानेच फिरतो. यामुळे भारतावर २४ तास सतत लक्ष ठेवणार. जीएसएलव्ही-एफ १७ या प्रक्षेपण वाहण्यात पाठवण्यात आलेला सर्वाधिक वजनाचा उपग्रह आहे. त्याचे वजन २३६७ किलो आहे.
शेतीचे निरीक्षण करणार
ईओएस-०५ हा कॅमेरा शेतीच निरीक्षण, चक्रीवादळ, पूर, ढगफुटी, सीमेवरील हालचाल अशा देशाच्या सुरक्षितेसाठी महत्वाच्या माहितीचे लाईव्ह फोटो पाठवणार. आतापर्यंत आपले उपग्रह कमी उंचीवरून फोटो काढायचे. म्हणजे ६०० किमी अंतरावरून फोटो काढायचे. त्यामुळे २४ तासातून एकदाच आपल्याला फोटो मिळत होते. मात्र आता हा कॅमेरा ३६००० किमी वरून आपल्याला भारतावर २४/७ करडी नजर ठेवणार आहे. हे उपग्रह ९ वर्ष काम करणार. या उपग्रहाला ‘आय इन स्काय’ असे एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने वर्णन केले आहे.
भारताचा पहिला समर्पित इमेजिंग उपग्रह : डॉ. व्ही. नारायणन
इस्रो प्रमुख डॉ. व्ही. नारायणन म्हणाले की, मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, जीएसएलव्ही-एफ१७ या प्रक्षेपकाने ईओएस-०५ या जिओ-इमेजिंग उपग्रहाला त्याच्या नियोजित आणि आवश्यक कक्षेत यशस्वीरीत्या व अचूकपणे स्थापित केले आहे. ईओएस-०५ हा कार्यान्वित झाल्यानंतर भूस्थिर कक्षेतून कार्य करणारा भारताचा पहिला समर्पित इमेजिंग उपग्रह ठरणार आहे. हे उपग्रह महत्वाचे स्ट्रॅटेजिक डाटा भारताला पुरवेल अशी अपेक्षा आहे.
सर्वांत जड उपग्रह
मिशन डायरेक्टर थॉमस कुरियन यांनी सांगितले की, जीएसएलव्ही-एफ १७ हे प्रक्षेपण वाहन ५१.७ मीटर उंच असून त्याचे लिफ्टऑफ वजन ४२०.५ टन आहे. त्यामुळे हे भारतातील कार्यरत असलेल्या सर्वात मोठ्या प्रक्षेपण वाहनांपैकी एक आहे. या ईओएस निअर रिअल-टाइम फोटो घेण्यास सक्षम आहे. जीएसएलव्हीद्वारे जीटीओ किंवा सब-जीटीओ कक्षेत प्रक्षेपित केलेला हा आतापर्यंतचा सर्वात जड उपग्रह आहे असेही त्यांनी नमूद केले.
गुंतागुंतीचा उपग्रह : अहमद
प्रकल्प संचालक इम्तियाज अहमद यांनी ईओएस-०५ चे वर्णन मल्टी-बँड’ कार्य करण्याची क्षमता असलेला एक अद्वितीय आणि वैशिष्टयपूर्ण उपग्रह असे केले आहे. त्याची रचना, यंत्रणा आणि कार्य क्षमता या दृष्टीने हा एक गुंतागुंतीचा उपग्रह आहे. प्रक्षेपणाची प्रक्रिया बुधवारी रात्री ११:३० वाजता सुरु झाली. २७ तासांची सुरळीत काऊंटडाऊन पूर्ण झाल्यानंतर सतीश धवन अंतराळ केंद्रावरील दुस-या प्रक्षेपण मंचावरून पहाटे २:५५ वाजता या रॉकेटने आपली झेप घेतली.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. त्यांनी जीएसएलव्ही-एफ १७ आणि ईओएस-०५ ही मोहीम यशस्वी प्रक्षेपण झाली. ही कामगिरी देशासाठी अभिमान असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उत्कृष्टता, नवकल्पना आणि वाढत्या क्षमतांचे हे प्रतिबिंब असल्याचे मोदी यांनी नमूद केले. इस्रो आणि भारतीय खासगी उद्योजक क्षेत्रातील वाढती पार्टनरशिप हे नवीन बळ आणि व्यापकता मिळत असल्याने संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये क्षमता वाढत आहे.
















