पालघर : प्रतिनिधी
नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरात राहणा-या २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे गावातील साई संतोषी इमारतीत राहणा-या अभिनेत्री संचिता उगले हिने शनिवारी (१४ जून) सायंकाळी सुमारे ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये आत्महत्या केली. यावेळी तिने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी व स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच आचोळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिस तपास सुरू
दरम्यान, मृत अभिनेत्रीचे वडील मच्छिंद्र उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आचोळे पोलिसांनी रविवारी (१५जून) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही.
संचिताने ‘छावा’त केले काम
अभिनेत्री संचिता उगले हिनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या प्रसिद्ध शोमधून संचितानं आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ शोमध्येही तिने काम केले आहे. संचिताने फिल्ममध्येही काम केले आहे. विक्की कौशल स्टार फिल्म ‘छावा’चा ती भाग होती. यामध्ये तिने ताराबाई ही भूमिका साकारलेली.
















