सोलापूर : सोलापूरच्या तापमानात दोन दिवसांत १.४ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. सोलापूरच्या तापमानाने आतापर्यंत चाळिशी ओलांडली होती. सोलापुरात सूर्य अक्षरशः आग ओकत होता. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शहर व परिसरात झाली आहे.
होळीनंतर सोलापूरच्या वातावरणात सूर्याचे रौद्र रूप बधायला मिळू लागले आहे. होळीदिवशी रविवारी सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. त्यानंतर ४१.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उन्हाचा कडाका व उकाडा वाढल्याने दुपारी रस्त्यावर कमी गर्दी दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पांढरे कपडे, रुमाल, टोपी, गॉगल्स वापराचे प्रमाण वाढले आहे.
दुपारच्या सुमारास शक्यतो बाहेर पडू नये. शरीरातील पाणीपातळी संतुलित राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता वाढली आहे. पायात गोळे येणे, चक्कर येणे, ताप येणे, जास्त घाम येणे यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगीतले.
शुक्रवारी ढगाळ वातावरणाची शक्यता
सोलापुरात उच्चांकी तापमान नोंद झाल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे शुक्रवारी (ता. २९) सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात सोलापुरात गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याच्याही नोंदी आहेत. तापमानाचा पारा भडकल्यानंतर अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.