34.5 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात पक्षांतर्गत नाराजीचा सूर

पुण्यात पक्षांतर्गत नाराजीचा सूर

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवार प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असली तरी पक्षांतर्गत नाराजीचा सूर अधूनमधून समोर येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयात बदल झाला तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्यात यश आले असल्याने या मतदारसंघात थेट लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री शिवतारे यांनी जाहीरपणे काही वक्तव्य करून या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते त्याचप्रमाणे त्यांनी सातत्याने विविध विधानांच्या माध्यमातून जाहीरपणे टीका केली होती. ते जर अपक्ष उभे राहिले असते तर तिरंगी लढत झाली असती आणि हे महायुतीला परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांची समजूत काढण्यात महायुतीच्या सर्व नेत्यांना यश आल्याने या प्रश्नावर आता पडदा पडला आहे त्याचप्रमाणे माजी मंत्री पाटील यांची नेत्याबरोबर चर्चा झाली असल्याने महायुतीचा मार्ग सुकर झाला असल्याचे समजले जात आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात देखील भाजपा आणि काँग्रेस पक्षात कुरबुरी असल्याचे समजते. काँग्रेस पक्षात इच्छुकांनी नाराजीचा सूर काढला आहे. कारण विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यापेक्षा अन्य इच्छुकांना मिळायला हवी होती असे काहींनी बोलून दाखविले. त्यामुळे प्रचारासाठीचे मनोमिलन पूर्णपणे झाले असे दिसत नाही. हीच स्थिती कमीअधिक प्रमाणात भाजपामध्ये असल्याचे दिसते. जी मंडळी उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक होती त्यांना डावलले गेल्याने ही मंडळी अजूनही प्रचारापासून दूर राहिली असल्याचे दिसते आहे. यावर पक्षनेतृत्व काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR