मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि विनोदी चित्रपटांचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन तब्बल १४ वर्षांनंतर ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजपाल यादव, परेश रावल यांची जुनी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खदखदून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन जोडी पुन्हा धुमाकूळ घालायला सज्ज झाली आहे. ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैय्या’सारखे हिट विनोदी चित्रपट त्यांनी दिले आहेत. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही जोडी पुन्हा एकदा ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवायला आणि घाबरायला सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे.
‘भूत बंगला’च्या निमित्ताने केवळ अक्षय आणि प्रियदर्शनच नव्हे तर अक्षयची ‘कॉमेडी गँग’देखील पुन्हा मैदानात उतरली आहे. ट्रेलरमध्ये राजपाल यादव, परेश रावल आणि असरानी यांची झलक पाहायला मिळत आहे. या दिग्गज कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असणार.
ट्रेलरची सुरुवात एका गूढ आणि भयावह महालापासून होते. मात्र, जसा अक्षय कुमारचा प्रवेश होतो, तसा भीतीचा माहोल विनोदात बदलतो. अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये दिसतोय. ‘भूल भुलैय्या’ मधील त्याचा ‘डॉ. आदित्य श्रीवास्तव’आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, आणि ‘भूत बंगला’ मध्येही तो थोडा मजेशीरही दिसतो. दुसरीकडे, अभिनेत्री वामी गब्बीचीही झलक यात दिसतेय.
हसता हसता फुटणार घाम?
चित्रपटाचा जॉनर ‘हॉरर-कॉमेडी’ आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, एका झपाटलेल्या बंगल्यात ही संपूर्ण गँग अडकते आणि तिथून बाहेर पडण्यासाठी होणारी त्यांची धडपड प्रेक्षकांना खदखदून हसवणारी ठरेल. विशेषत: राजपाल यादवचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे आहेत. तर दुसरीकडे, अक्षय कुमारची ‘कॉमेडी टायमिंग’ देखील तितकीच प्रभावी आहे.

