21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमाळशिरसला चार दिवसांआड पुरवठा

माळशिरसला चार दिवसांआड पुरवठा

अकलूज : माळशिरस शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या तळ्याची पाणी साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे माळशिरसकरांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असून तळ्याची साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सुरवातीच्या काळात शहराला शहरालगत असलेल्या महाबळेश्वर विहिरीमधून पाणीपुरवठा केला जात होता. गावचा विस्तार झाल्यानंतर तसेच लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर १९९० च्या सुमारास फुलेनगर येथे नीरा कालव्यानजीक १ कोटी ९० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेले तळे करण्यात आले.

न्यायालयाजवळ ३ लाख लिटर पाणी क्षमता व शारसी जीवन प्लॉट येथे २ लाख ६० हजार पाणी साठवण क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. त्यामधून शहरास पाणी पुरवठा केला जात आहे. या दोन्ही टाक्या भरण्यास साधारण १८ तास लागतात. नीरा कालव्यालगत तळे असल्याने पाण्याची कमतरता भासत नाही. परंतु कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर तळ्यात गाळ असल्याने व पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या शहरात चार दिवसानंतर पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेची टाकी जुनी झाल्याने यावर असलेल्या नळांना मोटारीने पाणी सोडले जात आहे. गावाची वाढती लोकसंख्या पाहता नवीन पाणी पुरवठा योजना उभारणे आवश्यक आहे.

माळशिरस शहरातील नागरिकांनी स्वतःच्या घराचे बांधकाम करतानाच विंधन विहिरी खोदल्या आहेत. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने व गाव ओढ्यास पाणी नसल्याने, नीरा कालव्याच्या ५८ फाट्यास केवळ एक दिवस पाणी सोडल्याने गावातील विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. गाव ओढ़ा व ५८ फाटा सुरू असल्यास गावातील विंधन विहिरीचे पाणी कमी होत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई भासत नाही. माळशिरस शहराची लोकसंख्या विचारात घेऊन शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव केला आहे. या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली असून आचारसंहिता संपल्यानंतर या कामाची टेंडर प्रकिया सुरू होईल.असे माजी नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख यांनी सांगीतले.

शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नगरपंचायतीने स्वतःच्या मालकीचा पाण्याचा टैंकर व ट्रक्टर खरेदी केला आहे. यामधून नागरिकांना पाणी पुरविले जात आहे असे माळशिरसच्या नगराध्यक्षा ताई बाबरे यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR