नवी दिल्ली : दिशाभूल करणा-या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना अवमानना नोटीस बजावली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने २०२२ मध्ये पतंजली विरोधात गुन्हा दाखल केला होता. आयएमएने याचिकेत म्हटले होते की, बाबा रामदेव सोशल मीडियावर अॅलोपॅथीविरोधात चुकीची माहिती पसरवत आहेत.
न्यायमूर्ती अमानुल्ला यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी शेवटची सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने म्हटले होते की, पतंजलीला दिशाभूल करणा-या सर्व जाहिराती तातडीने बंद कराव्या लागतील. न्यायालय अशा कोणत्याही उल्लंघनास गांभीर्याने घेईल आणि उत्पादनावरील प्रत्येक खोट्या दाव्यासाठी १ कोटी रुपयांपर्यंत दंड आकारू शकते. आयएमएच्या वतीने कोर्टात उपस्थित असलेले वकील पीएस पटवालिया म्हणाले की पतंजलीने योगाने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. त्यावर कोर्ट म्हणाले कोर्टाच्या आदेशानंतरही ही जाहिरात आणण्याची तुमची (पतंजली) हिंमत होते.