नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जैन यांचा अंतरिम जामीन ८ जानेवारीपर्यंत वाढवला आहे. आता या प्रकरणावर ८ जानेवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनासाठी जैन यांची याचिका सूचीबद्ध करण्याच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
जैन यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाचा उल्लेख केला आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा रजेवरून परत येईपर्यंत न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सूचीबद्ध प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. न्यायमूर्ती बोपण्णा यांच्या अध्यक्षतेखालील मूळ खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करावी, अशी मागणी सिंघवी यांनी केली.