जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पॅरामोटोरिंग या साहसी खेळाचा जेजुरीत आनंद लुटला. यात बसून उड्डाण केल्यानंतर सुमारे १००० फुटावरुन त्यांनी जेजुरी गडाचे विहंगम दृश्य अनुभवले. या थरारक अनुभवाबद्दल सुळे यांनी आनंद व्यक्त केला.
सुप्रिया सुळे यांनी जेजुरीगडाचे आकाशातून दर्शन घेतले. जेजुरी येथील फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ८०० ते १००० फूट उंचीवरुन जयाद्रीच्या जेजुरी गडाच्या दर्शनाचा आनंद घेतला. जेजुरी येथील अॅकॅडमीकडे सुळे यांनी हा साहसी खेळ खेळण्याचा आग्रह धरल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे.
या खास राईडबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केलं असून प्रख्यात अशा पर्यटनस्थळी हा अनोखा तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रचंड आनंद देऊन गेला, असेही त्या यावेळी म्हणाल्या. सुमारे दहा मिनिटे त्यांनी या सहासी खेळाचा आनंद लुटला.
काय आहे पॅरामोटरिंग?
पॅरामोटरिंग हा साहसी खेळाचा प्रकार आहे. यामध्ये पॅराग्लायंिडगप्रमाणं मागे सेल असते आणि पुढे दोघांना बसण्याची जागा असते. या मशिनला दोन मोटर्स बसवलेल्या असतात. पॅराग्लायडिंगप्रमाणे मोटरच्या सहाय्याने यातून आकाशातून सैर करता येते. यामध्ये मोटरचा वापर करण्यात आल्याने त्याला पॅरामोटरिंग असे म्हणतात.