नवी दिल्ली/नागपूर : ज्या दाम्पत्याला स्वत: गर्भधारणा करणे शक्य नसते त्यांच्यासाठी दुसरी महिला गर्भधारणा करते. तिला सरोगेट मदर(आई) म्हणतात…असाच आविष्कार ईटीटी-आयव्हीएएफ जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने गायीवर करणे शक्य झाले आहे. यामुळे दुग्ध उत्पादनवाढीसाठी उच्च दर्जाचे वासरू जन्माला घालणे शक्य झाले आहे.
केंद्र सरकारचे राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात उभारलेल्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (ईटीटी) आणि कृत्रिम परिवेषीय निषेचन (आयव्हीएफ) प्रयोगशाळेत हा आविष्कार साकारला जातोय. या माध्यमातून दुग्ध उत्पादनाची उच्च अनुवांशिकता असलेल्या साहिवाल, गीर, गवळाऊ, डांगी, देवनी या देशी गायींचे पुनरुत्पादन केले जात आहे. वडसा येथील वळू माता संगोपन केंद्र, देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंघान केंद्र आदी ठिकाणी प्रयोग करून १५८ गायींमध्ये आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली असून ७२ सुदृढ वासरे जन्माला आली आहेत.
प्रामुख्याने जर्सी, गिर, साहिवाल यांसारख्या जास्त दूध देणा-या जातींचा विस्तार करणे आणि रस्ते किंवा गोशाळेतील कमी दुभत्या गायींमधूनही चांगली वासरू मिळवणे. या पद्धतीमुळे एका वर्षात एका गायीपासून ४-५ पिल्ले मिळवणे शक्य होते, तर सामान्य प्रक्रियेत हे प्रमाण ७-८ वर्षांत खूप कमी असते. सरोगसीतून जन्माला आलेली वासरू पुढे जाऊन दिवसाला १५-२० लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते. जबलपुर, बरेली आणि इतर ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी वासरांचा जन्म झाला आहे. दरम्यान गायींवर सरोगसी ही एक प्रगत प्रजनन तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये उच्च वंशावळीच्या गायीचा गर्भ कमी दूध देणा-या किंवा सामान्य गायीच्या गर्भाशयात विकसित केला जातो. या तंत्रज्ञानामुळे एकाच वर्षात उत्कृष्ट नस्लीचे अनेक वासरू मिळवणे शक्य झाले असून दूध उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे.
ईटीटी-आयव्हीएफ म्हणजे काय?
– देशी गोवंशाचे संवर्धन व दूध उत्पादनात गुणात्मक वाढ साधण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि त्यावर आधारित एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी (ईटीटी) या तंत्रज्ञानाचा वापर हा गोपालन क्षेत्रात केला जात आहे.
– या जैवतंत्रज्ञानात उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असणा-या देशी गोवंशाच्या दाता गायीच्या गर्भाशयाच्या बिजांडावरील बीजकोषातून स्त्री बीजे अल्ट्रासोनोग्राफीच्या मदतीने एका नलिकेतून शोषून घेतले जातात.
– नंतर भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत स्त्री बिजांना विशिष्ट वातावरणात परिपक्व करून पुरुष बिजाद्वारे म्हणजेच शुक्रानूद्वारे फलन केले जाते. यातून निर्माण झालेला भ्रूण (टेस्ट ट्यूब बेबी) आठ दिवस वाढवून प्रत्यारोपणासाठी तयार केला जातो.
– हा तयार झालेला भ्रूण कमी दुग्ध उत्पादन क्षमता असणा-या गायीच्या गर्भाशयात विना शस्त्रक्रिया प्रत्यारोपित करण्यात येतो.

