सातारा : झारखंड रांची येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलिस बीडीएस पथकातील श्वान सूर्याने एक्सप्लोझिव्ह इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र पोलिस व सातारा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रांची येथील पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये देशातील २८ राज्य, स्पेशल फोर्सेस व केंद्रशासित प्रदेश असे मिळून एकूण ४४ संघांनी सहभाग नोंदविला होता. एक्सप्लोझिव्ह इव्हेंट विभागात लगेज सर्च, ग्राऊंड सर्च, कार सर्च, फूड रेप्यूजन आणि आज्ञाधारकपणा अशा प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. सातारा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात श्वान सूर्या याने प्रथमच एक्सप्लोझिव्ह विभागात सुवर्णपदक प्राप्त करून सातारा पोलिसांचे नाव देशात उंचावले.
श्वान सूर्या हा अतिशय हुशार व कर्तव्य तत्पर अज्ञाधारक श्वान आहे. त्याचे हॅन्डलर म्हणून पोलिस हवालदार नीलेश दयाळ, सेकंड हॅन्डलर सागर गोगावले यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस यांनी त्यांचा सत्कार केला.