मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली असताना, बॉलिवूड इंडस्ट्रीसह राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच अभिनेता शाहरुख खानच्या घरात अशाच पद्धतीने घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. २-३ दिवसांपूर्वी शाहरुखच्या मुंबईतील मन्नत बंगल्यात घुसखोरी करण्याचा एका अज्ञात इसमाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भिंतीवर चढून देखील मध्ये जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात हा व्यक्ति अपयशी ठरल्याचेही सांगितले जात आहे.
मन्नत बंगल्यातील कुंपन भिंतीवर असलेल्या जाळीमुळे शाहरुखच्या घरात घुसण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मात्र घरात घुसखोरी करण्यामागील या व्यक्तिचे नेमका उद्देश आणि कारण काय? हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसखोरी करणारा व्यक्ति एकच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न आता विचारले जात आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणा-या व्यक्तीने मुंबईतून पळ काढून नालासोपारा -विरारच्या दिशेने आपला मार्गक्रमण केला आहे. या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने नालासोपारा -विरार परिसरातील सर्व रेल्वे स्थानकं, बसस्थानकं, तसेच मुख्य रस्त्यांवर पाहणी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयांकडून कोणतीही मदत मागितली नाही. स्वत: सर्च ऑपरेशन करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.
हल्लाप्रकरणी तपासाला वेग
अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारीला मध्यरात्री सव्वा दोन ते अडीच्या दरम्यान एका व्यक्तीनं हल्ला केला होता. त्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली होती. अशातच सैफ अली खानचा हल्लेखोर नालासोपारा -विरारच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोर कोणत्या मार्गाने प्रवास करत आहे, त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत.