सोलापूर, – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभार आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी व जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊन विक्री होते, या ठिकाणी कांद्याच्या प्रत्येक पिशवीचे वजन न करता चार ते पाच पिशवींचे वजन करून उर्वरित पिशव्यांचे अंदाजे सरासरी वजन घरतात. तसे न करता प्रत्येक पिशवीचे वजन करावे.
शेतकऱ्यांना कांद्याची पट्टी (बिल) देताना पुढील वीस दिवसांनंतरची तारीख टाकून चेक दिला जातो. तसे न करता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चोवीस तासांच्या आतील चेक किंवा खात्यावर रक्कम जमा करावी, बाजार समितीच्या आवारातून अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याऐवजी कांदा बाजार समितीत आला की त्याची जबाबदारी संबंधित अडत व्यापारी व बाजार समितीची असावी, कांदा बाजार समितीत आला की संबंधित अडत्याने आगोदर वजन करावे त्यानंतर लिलाव झाले तरी चालतील. कांदा चोरी होऊ नये म्हणून कांदा विभागातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे चालू ठेवावेत. सध्या बहुतांश कॅमेरे बंद आहेत.
अनेक अडत व्यापारी शेतकऱ्यांना चेक देतात; परंतु ते चेक बॉउन्स होतात. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे मारूनही अडते शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत व शेतकऱ्यांची फसवणूक करतात. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अडत व्यापाऱ्यांचा बाजार समिती काही महिन्यांपुरते परवाना रद्द करते परंतु अशा अडत्यांकडे घरातील इतर सदस्यांच्या नावाने दुसरे परवाने असतात त्यामुळे ते अडत व्यापारी परवाना रद्द झालेले फर्म बंद करून दुसऱ्या फर्मच्या नावाने अडत व्यापार सुरू ठेवून पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आडत व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याबरोबरच त्याचा गाळा सील करावा म्हणजे तो दुसऱ्या फर्मच्या नावाने अडत व्यापार करणार नाही, याची बाजार समिती प्रशासनाने दक्षता घ्यावी.
बाजार समितीत शेतकऱ्यांचे खिसे कापणे, मोबाइल चोरीला जाणे, शेतकऱ्यांना दमदाटी करणे असे प्रकारही अनेक वेळा घडले आहेत. अशा प्रकारास आळा घालण्यासाठी बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी सुरू करावी.आपण यात लक्ष घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.