पुणे : प्रतिनिधी
स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून, शिवसैनिकांनी (ठाकरे गट) स्वारगेट येथे आंदोलन करत, सुरक्षारक्षकाच्या केबिनची तोडफोड केली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे शहर समन्वयक नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षारक्षकांच्या केबिनची तोडफोड केली. यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
यावेळी स्वारगेट बस डेपो येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. आम्हाला १५०० रुपये नको पण सुरक्षा द्या, अशा घोषणा देत गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी मोरे म्हणाले की, स्वारगेट डेपोमध्ये जिथे सुरक्षारक्षकांची केबिन आहे त्याच्या समोरच ही बस उभी असताना तिथे पीडित महिलेवर अत्याचाराची घटना घडली आहे. स्वारगेट आगारात २० सुरक्षारक्षक असताना एका महिलेवर अन्याय होतो, हे खूपच निषेधार्ह आहे. म्हणून आज आम्ही तीव्र आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वारगेट येथे या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कळविली आहे. ‘आप’चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. महिलांसाठी सुरक्षित असणारे पुणे शहर आता अत्यंत असुरक्षित झाले आहे, महिलांची जबाबदारी कोणावर? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सराईत गुन्हेगाराकडून हा गुन्हा घडला असून, हे गृह विभागाचे अपयश आहे. पुणे आता गुन्हेगारीचे शहर बनू लागले आहे, अशी टीका किर्दत यांनी केली. पुण्याची कायदा-सुव्यवस्था कुचकामी झाल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याची टीका प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे. पोलिस आणि गृहखात्याचा नाकर्तेपणा यातून स्पष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.