सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी स्टेशन ते होटगी स्टेशन दरम्यान असलेले सिमेंट फॅक्टरीचे चारही रेल्वे फाटक लवकरात लवकर बंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांचा अंत पाहू नका, तात्काळ पर्यायी उपाययोजना शोधून ब्रिज व उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही करण्याचेही आदेश ही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
आमदार सुभाष देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासन आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, झुयारी सिमेंट कंपनी तसेच चेट्टीनाड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्तपणे बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावली. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी रेल्वे फाटक सतत बंद करत असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाकरे, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच होटगीचे सरपंच अतुल गायकवाड, इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, राहुल वंजारे, प्रधान गुरव, सागर धुळवे यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कशी सुटका होईल आणि कायमस्वरूपी गेट हटवण्यासंदर्भात सिमेंट कंपन्यांनी उपाययोजना करावे, असे सांगितले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने गेट बंद करण्यासंदर्भात उपाययोजना केल्याचे सांगितले. झूयारी आणि चेट्टीनाड सिमेंट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात उपायोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.