25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeक्रीडाचक्रीवादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली

चक्रीवादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली

बार्बाडोस : भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला तरी भारतात परतलेला नाही. मॅच झाल्यानंतर दुस-याच दिवशी धोकादायक चक्रीवादळ वेस्ट इंडिजच्या आकाशात घोंघावू लागले होते. यामुळे वेस्ट इंडिजला जाणारी आणि येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली होती. आजही वेस्ट इंडिजमध्ये २५७ किमी प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने वारे सुरु आहेत. यामुळे टीम इंडियाला हॉटेलमध्येच थांबावे लागले आहे.

बारबाडोसमध्ये ही फायनल झाली होती. यानंतर दुस-यच दिवशी तिथे चक्रीवादळाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. हे सामान्य चक्रीवादळ नाही तर कॅटॅगरी ४ चे हे चक्रीवादळ आहे. या वादळामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अनेक घरांची छप्परे उडून गेली आहेत. बार्बाडोस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन बेटे, ग्रेनाडा आणि टोबॅगो या भागांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव आहे. डोमिनिका आणि हैतीसाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हे वारे गोलाकार वाहत असल्याने त्याचा प्रभाव खूप जास्त असतो. असे वादळ १० वर्षांतून एकदा येते.

काही वेळात वा-याचा वेग कमी होणार असल्याचा अंदाज आहे. यानंतर वातावरण पाहून हवाई सेवा सुरु केली जाणार आहे. टीम इंडियाला सुखरूप भारतात आणण्यासाठी बीसीसीआयने खास चार्टर्ड प्लेन तयार ठेवले आहे. हे विमान मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता टीम इंडियाला घेऊन भारताकडे उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले होते. हे विमान भारतात बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता उतरेल अशी अपेक्षा आहे. आता हे सर्व चक्रीवादळावर अवलंबून आहे. यामुळे ही वेळ मागे पुढे होऊ शकते. सोमवारी रात्रीपर्यंत पाऊस थांबला, परंतु जोरदार वारे कायम होते, तसेच हवामानही ढगाळ आहे. भारतीय संघासोबतच अनेक पत्रकारही बार्बाडोसमध्ये अडकले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह हेदेखील संघासोबत बार्बाडोस येथे असून ते संघासोबतच परतणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR