सोलापूर : श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील संवर्धनाचे काम करताना पुरातत्व विभागाने मंदिर, देवतांच्या मूर्ती, मंदिरांतील पुरातन परंपरा, तसेच मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व यांची हेळसांड करू नये असे झाल्यास मंदिर विश्वस्त, भक्त आणि हिंदू रस्त्यावर उतरून याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. मंदिर महासंघाचाही याला विरोध असेल. मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा परस्पर समन्वय आणि संघटन आवश्यक आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
ते पद्मावती कन्व्हेन्शन हॉल, अक्कलकोट रोड, एमआयडीसी येथे आयोजित जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनात सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील मंदिर विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अधिवेशनाची सुरुवात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, सुनील घनवट, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, प्रज्ञापूरी ज्ञानपीठा चे पिठासन धर्माधिकारी प्रसाद पंडित, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक . सत्यनारायण गुर्रम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश पू. (कु.) दीपाली मतकर यांनी वाचला, तर अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे मिनेश पुजारे यांनी केले. या वेळी . दीलीप देशमुख यांनी मंदिरांसंदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शन केले.