ऐझॉल : मिझोरमचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अनिल शुक्ला यांनी म्हटले आहे की, भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. म्यानमारच्या चिन राज्याच्या सीमावर्ती भागात बंडखोर गट आणि लष्कर यांच्यातील नुकत्याच झालेल्या लढाईनंतर, मिझोराममधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे, परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे. या लढाईमुळे पन्नास हजारांहून अधिक लोक मिझोरामच्या सीमा भागात घुसले होते, त्यापैकी बहुतेकांना परत पाठवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, या काळात काही लोक जखमी झाले आहेत, त्यांना चंफई आणि आयझॉलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डीजीपी अनिल शुक्ला म्हणाले की, गेल्या आठवड्यात भारतीय हद्दीत घुसलेल्या म्यानमारच्या ७५ सैनिकांना परत पाठवण्यात आले आहे. भारतीय सीमेमध्ये आमच्या कोणत्याही नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. सीमेजवळ तैनात आसाम रायफल्ससह मिझोराम पोलीसही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे ते म्हणाले. सीमेपलीकडील लढाईत भारताच्या नागरिकांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आमचे लोक पूर्णपणे ठीक आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांनी सांगितले की, आमच्या स्थानिक लोकांनी आणि एनजीओ सदस्यांनी भारतात प्रवेश केलेल्या लोकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.