पाटणा : बिहारमधील सारण जिल्ह्यातील सदर उपविभागात शुक्रवारी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता छपरा शहरातील नवीन बाजारपेठेतून दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना घडली. सारण पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, या काळात मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात आला, त्याच्या निषेधार्थ समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणून मूर्ती ताब्यात घेऊन विसर्जित केल्या.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांनी सांगितले की, घटनेच्या वेळी एकही पत्रकार उपस्थित नव्हता, मात्र जेव्हा ते घटनेनंतर पोहोचले तेव्हा सर्वत्र विटा आणि दगड पसरलेले होते, लोकांच्या घराच्या काचा फुटल्या होत्या. नंतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, तेथे पोलिस उपस्थित होते, परंतु त्यांची संख्यात्मक ताकद खूपच कमी होती, त्यामुळे गर्दी हाताळणे कठीण होते. या घटनेनंतर अफवा रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सदर उपविभागात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सरणचे एसपी गौरव मंगला यांनी पत्रकारांना सांगितले की, परिस्थिती शांततापूर्ण आहे. परिसरात पोलिस तळ ठोकून आहेत. या संदर्भात व्हीडीओग्राफीद्वारे सर्व समाजकंटकांची ओळख पटवून कारवाई केली जाईल. या घटनेत काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.