नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज कॉक्रोच जनता पार्टीसंसदेवर धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी राजधानी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलिसांनीही या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. त्यातच आता जंतर मंतर येथे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समोर आले आहे.
‘चलो संसद’ या मोर्चात मोठ्या प्रमाणात तरूण जंतर मंतर परिसरात जमले होते. हा मोर्चा संसदेच्या दिशेने जाणार होता. परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर सकाळपासून गर्दी वाढत होती. त्यात जमावाकडून बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे येथील वातावरण तापले. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला. अनेक आंदोलनकर्त्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे काही नेते आंदोलनस्थळी आले होते. त्यांनाही पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले.
कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकार, पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, जबाबदारी निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यात २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आले होते. आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे दिल्लीत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र तरीही मोठ्या संख्येने आंदोलक जंतर मंतर परिसरात जमा झाले. या आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समोर आले.
दरम्यान, सरकारने आमच्याशी संवाद साधावा. आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु अद्याप सरकारकडून कुठलीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. आम्ही आमचे उपोषण सुरूच ठेवू. देशातील युवक आज रस्त्यावर उतरला आहे. आज संसदेकडे जाणारा मोर्चा हा शांततेत निघेल. मागील ३० दिवसांपासून आंदोलक जंतर मंतर येथे जमले होते. त्यामुळे शांततेत आंदोलन कसे होते हे या तरूणांनी दाखवून दिले आहे असा विश्वास कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी व्यक्त केला आहे.
















