श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये ८५ कोटी रुपयांच्या दहशतवादी फंडिंगमध्ये गुंतलेल्या रॅकेटवचा पर्दाफाश झाला आहे. कारवाईचा एक भाग म्हणून छापा टाकण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि श्रीनगरमधील एक प्रमुख व्यावसायिक यांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्रकरण नुकतेच उघडकीस आलेले देशातील सर्वात मोठे दहशतवादी फंडिंग प्रकरण असू शकते. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची मुख्य तपास यंत्रणा राज्य तपास संस्थेने (एसआयए) बुधवार ते शुक्रवार दरम्यान छापा टाकला.
एसआयएने म्हटले आहे की, हे एक दहशतवादी फंडिंग प्रकरण आहे ज्यामध्ये ८५ कोटी रुपयांचा निधी गुप्त चॅनेलद्वारे गोळा केला गेला आणि लाँड्रिंग करण्यात आला. एसआयएला संशय आहे की, हा पैसा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद आणि फुटीरतावादासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वापरला गेला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी शुक्रवारी तीन जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. खोऱ्यातील श्रीनगर, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात छापे टाकण्यात आल्याचे एसआयएने सांगितले. एजन्सीच्या विशेष पथकाने तीन जिल्ह्यांत १० ठिकाणी शोध घेतला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ८ नोव्हेंबर रोजी टाकलेल्या छाप्याचा एक भाग म्हणून, एसआयएने श्रीनगरमधील दोन, अनंतनागमधील एक आणि पुलवामामधील सात ठिकाणांसह अनेक ठिकाणी शोध घेतला. एसआयएच्या म्हणण्यानुसार, एसआयए काश्मीर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका गुन्ह्यात सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून शुक्रवारी पहाटे शोध घेण्यात आला. केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांना वित्तपुरवठा करण्यासाठी या मनी लाँड्रिंगचा वापर केला जाणार होता, असे एसआयएने म्हटले आहे.
दुबईशी संबंध
कथित मनी-लाँड्रिंग नेटवर्कचे दुबईशी संबंध आहेत. बुधवारपासून काश्मीर आणि नवी दिल्ली येथे टाकण्यात आलेले छापे हे संबंध उघड करण्यासाठी आणि मनी ट्रेल स्थापित करण्यासाठी तपासाचा एक भाग होता. सोन्याची तस्करी आणि इतर मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणावर होणारी मनी लाँड्रिंग ही काश्मीरमधील पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी यापूर्वी उघड केलेल्या दहशतवादी फंडिंग प्रकरणांपेक्षा खूप मोठी आहे.
साहित्य जप्त
एसआयएच्या विशेष पथकाने मोबाईल, लॅपटॉप, सिम कार्ड, पासपोर्ट, चेक, पासबुक आणि क्रेडिट/डेबिट कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले आहे. एजन्सीने पुनरुच्चार केला की, ते “या कृत्यामागील व्यापक संबंध उघड करण्याबरोबरच सर्वांना न्याय मिळवून देईल.