बारामुल्ला : जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पुंछमधील हल्ल्यानंतर आता दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथे एका निवृत्त अधिका-यांना लक्ष्य केले आहे. बारामुल्ला येथील गेंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी मशिदीत घुसून निवृत्त एसएसपींची गोळ्या झाडून हत्या केली. निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी हे मशिदीत अजान पढत असताना दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शीरी बारामुल्ला येथील गेंटमुल्ला येथे एका निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांच्यावर मशिदीत अजान पढत असताना गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस आणि लष्कराने परिसराला घेराव घातला आहे. शफी यांच्यावर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हा नियोजनबद्ध हल्ला होता असे शफी यांच्या भावाने सांगितले आहे.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून पुंछ भागात शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी बालामुल्ला येथे माजी अधिका-याची हत्या केली आहे. पुंछ जिल्ह्यात गुरुवारी हत्यारबंद दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ४ जवानांना वीरमरण आले होते. त्यातील दोन जवानांचे मृतदेह हे छिन्नविछिन्न झालेल्या स्थितीत होते, अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. पुंछमधील डेरा गली येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या चार जवानांना आज राजौरी येथे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच हे जवान जिथे हुतात्मा झाले तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. इतिहासामध्ये असे पहिल्यांदाच घडणार आहे.