बंगळुरू : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची (युएव्ही) यशस्वी प्रायोगिक उड्डाण चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, हाय-स्पीड युएव्हीच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अशा प्रकारचे तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या विशेष गटात सामील झाला आहे. हे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. मंत्रालयाने सांगितले की, डीआरडीओने चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमधून स्वदेशी हाय-स्पीड मानवरहित हवाई वाहन (युएव्ही) ची यशस्वी चाचणी केली.
या प्रणालीच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, अशा विशेष तंत्रज्ञानाचा स्वदेशी पद्धतीने यशस्वी विकास केल्यास सशस्त्र दल आणखी मजबूत होईल. हे युएव्ही डीआरडीओच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने विकसित केले आहे. मंत्रालयाने सांगितले की, या युएव्हीने पहिले उड्डाण जुलै २०२२ मध्ये केले होते, त्यानंतर देशांतर्गत तयार केलेल्या दोन प्रोटोटाइपचा वापर करून सहा उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत.