23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनगर, शिर्डीवर ठाकरे गटाचा दावा?

नगर, शिर्डीवर ठाकरे गटाचा दावा?

नगर : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे घोडे अद्याप अडलेले आहे. तथापि, महाविकास आघाडीतील घटकपक्ष विविध जागांसाठी दावे करून तयारीला लागले आहेत. यामध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे. आता त्यांनी एक-एका मतदारसंघात बांधणी सुरू केली असून, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावरही दावा केला आहे. खा. संजय राऊत यांनी २ वेळा नगरचा दौरा केला. या दौ-यादरम्यान खा. राऊत यांनी नगर जिल्ह्यातील या दोन्ही जागांवर दावा केला.

खा. संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी राज्यात दौरे करून पक्षाचे बळ वाढविण्याचे काम केले आहे. खा. राऊत यांनी तर नाशिक, नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत करीत दोनवेळा दौरे केले आणि नागरिकांशी संवाद साधतानाच मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शनही केले. विशेषत: नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाचेच उमेदवार असतील, असे सांगितले. त्यातच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही शिर्डी आणि नगरच्या दौ-यावर येत आहेत. दोन्ही मतदारसंघात ठाकरेंच्या उपस्थितीत संवाद मेळावे होत आहेत. त्यासाठी ते १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी या दोन्ही मतदारसंघात मेळावे घेणार आहेत.

१३ फेब्रुवारी रोजी आमदार शंकरराव गडाख यांनी सोनईत संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राहुरी बाजार समितीमध्ये कार्यक्रम आणि श्रीरामपूर तसेच राहाता येथेही मेळावा होणार आहे. त्यानंतर शिर्डीत मुक्काम आणि १४ फेब्रुवारी रोजी कोपरगाव, संगमनेर व अकोले येथे संवाद मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत ठाकरे गटाचेच उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग महाविकास आघाडीचे काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिर्डी आणि नगरच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसने दावा केला आहे, तर नगरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्याने आता नगर दक्षिण मतदारसंघाची राष्ट्रवादीची पकड ढिली झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या मागणीचा विचार न करता ठाकरे गटाने शिर्डीतही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

आघाडीत अस्वस्थता?
एकीकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी मोडकळीस निघत असल्याचे चिन्हे असतानाच राज्यातही ठाकरे गटाने जागा वाटप जैसे थे स्थितीत ठेवून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे जागा वाटपाचा विचार न करता विविध मतदारसंघात दौरे सुरू केल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यात जागा वाटपाचा तिढा कायम असला तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिढा सुटेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR