29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीची प्रतिष्ठा कुणी वाढविली? बारामतीकर योग्य निर्णय घेतील : पवार

बारामतीची प्रतिष्ठा कुणी वाढविली? बारामतीकर योग्य निर्णय घेतील : पवार

पुणे : प्रतिनिधी
बारामतीचा विकास कुणी केला आणि कसा झाला, प्रतिष्ठा नेमकी कुणी वाढविली. हे सर्व बारामतीकरांनी पाहिलेले आहे. मुळात या भागातील लोक शहाणे आणि समंजस आहेत. त्यामुळे बारामतीकर योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना मी निवडणूक लढणार नाही. त्यामुळे लोकांना भावनिक आवाहन करण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या डॉक्टर सेलचा आज पुण्यात मेळावा झाला, या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर जहरी टीका करताना काही लोक शेवटची निवडणूक असल्याचे सांगून भावनिक करतील, त्यामुळे त्यांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका. मी जो उमेदवार देईल, तो मीच उमेदवार समजून निवडून द्या, असे आवाहन केले होते. त्यावर आज उत्तर देताना पवार यांनी मुळात मी निवडणूक लढणार नाही, त्यामुळे भावनिक आवाहनाचा प्रश्नच येत नाही, असे म्हटले.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याच्या मुद्यावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत माझे दोनवेळा चिन्ह गेले. पण त्याचा फारसा परिणाम होत नसतो. ते फक्त मर्यादित काळासाठी उपयुक्त असते. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही. परंतु निवडणूक आयोगाने जो निकाल दिला, तो धक्कादायक आहे. कारण त्यांनी पक्ष दुस-यांना दिला. ज्यांनी पक्षाची स्थापना केली, पक्षाची उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेतला. हे इतिहासात पहिल्यांदाच घडले. सुप्रीम कोर्टात नक्कीच योग्य तो निकाल लागेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. काही मंडळी झुंडशाहीच्या मार्गाने जात आहेत. परंतु महाराष्ट्रातील नागरिक यांना नक्कीच जागा दाखवितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग
भाजपकडून सातत्याने सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकाही भाजप नेत्यावर ईडीची कारवाई झालेली नाही. सर्व कारवाया विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का, असा सवाल उपस्थित करीत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

विकासासाठी पक्ष सोडला म्हणण्यात तथ्य नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने राज्यातील जनतेच्या विकासासाठी आम्ही पक्ष सोडला आणि सत्तेत सहभागी झालो, असे सांगत आहेत. मात्र, ते बाहेर का पडले, याची जनतेला कल्पना आहे. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला म्हणण्याच्या दाव्यात तथ्य नाही, असेही शरद पवार म्हणाले.

आता सर्वांची विचारपूस केली जाते : अजित पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात या अगोदर कोणालाही फोन केले जात नव्हते. तसेच विचारपूसही होत नव्हती. परंतु आता विचारपूस केली जाते. त्यामुळे कोणाही चलबिचल होऊ नये, निष्कारण कोणाच्या आवाहनाला बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हही मिळाले. त्यानंतर प्रथमच पुण्यातील बालेवाडीत राष्ट्रवादीचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR