पुणे : राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? क्षुल्लक गोष्टीवरून आपण राजकारण करत असतो; मात्र महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचे कर्ज आहे, हे पैसे आपण कुठून आणणार? त्याच्यावर कोणीच बोलत नाही. कारण आपले अर्थमंत्री दहावी पास आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवार यांच्यावर टीका केली.
सत्ताधारी पक्षाकडे राजकारणी फोडण्यासाठी पैसा आहे. पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे; परंतु पावसामुळे हवालदिल झालेल्या, संकटात सापडलेल्या शेतक-यांना देण्यासाठी पैसा नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सरकार शेतक-यांचा केवळ मते फोडण्यासाठी वापर करतो, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
माहिती अधिकार कायद्याच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी माजी सनदी अधिकारी महेश झगडे, विजय कुंभार आदी उपस्थित होते. अंजली दमानिया म्हणाल्या, राजकारणात सगळ्या राजकीय पक्षाला वेगवेगळ्या पद्धतीने गुंड लागतात. हे जर सगळे बंद करायचे असेल तर राजकारणाचे चित्र बदलण्याची गरज आहे. पण, तो कुठलाही राजकारणी करत नाही. कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचे आहे. पुणे पोलिस आयुक्त यांनी घायवळला बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली, ती कोणामुळे दिली गेली. गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात, तर हे काय चाललंय? असा प्रश्न पडतो.
पोलिस फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपले दुर्दैव आहे. त्यासाठी सगळ्यांना लढायचे आहे. पण कसे लढायचे? काय लढायचे? या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे. राज्यातील पोलिस खरेच काही काम करतेय का? कारण आता जर आपण चोरीचे एखादे प्रकरण घेऊन पोलिस स्टेशनला गेलो, तर पोलिस त्यावर काडीमात्रही काही काम करत नाही असेही त्या म्हणाल्या.