22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रआदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच

आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच

जालना : मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजून ही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या.
तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार असल्याचे ते म्हणाले.

सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. मनोज जरांगे पाटील हे उद्या, २९ जानेवारी रोजी रायगडावर जाणार आहेत तसेच रायगडावर दर्शन घेणार आहेत. आंदोलन सुरू ठेवण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम आहेत.

फडणवीस, पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेणार नाही, असे फडणवीस म्हणाले. याला जरांगे पाटलांनी उत्तर दिले. मग आंदोलन सुरूच राहणार, असे जरांगे म्हणाले. आता लाख मराठाऐवजी लाख ओबीसी, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली होती. यावर उत्तर देताना दोन्ही आम्हीच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

तर आंदोलन फसते
गाफिल राहिलं तर आंदोलन फसतं. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय होत नाही. सरकारने कायदा केला. त्यांचे कौतुक केले. पण त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण सावध राहायचे आहे. विजय अजून दहा फुटावर आहे. इथूनच विजय झाला का म्हणायचे. दहा फूट पुढं जाऊन पाहू ना. थोडं आणखी पुढे जाऊ.

गाद्या, चटया आपल्याच आहेत
म्हणून ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोय-याला एक प्रमाणपत्र मिळावे. तरच पुढचा निर्णय घ्या. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू. आजही आपण तात्पुरते आंदोलन स्थगित करू शकतो. पण अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवू. सोय-याला एक प्रमाणपत्र मिळाले तर समजायचे आता सर्वच सोय-यांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. तरच आपल्या लोकांचे कल्याण झाले असे समजता येईल. कायदा झाला, अंमलबजावणी झालीच पाहिजे. हेच आपले मत आहे. एक प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. त्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ. मंडप आपला आहे, गाद्या-चटया आपल्या आहेत. भाडंही नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवू, असेही ते म्हणाले.

तरच विजयी कार्यक्रम घेऊ
पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी कार्यक्रम घेऊ. तोपर्यंत कोणताही विजयी कार्यक्रम घ्यायचा नाही. जो कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलो कायदा झाला. राज्यभर फिरलो ५४ लाख नोंदी मिळाल्या. केवळ मोर्चे काढून ताकद दाखवून ओळख मिळवण्यात मला रस नाही. कोणताही कार्यक्रम घेतल्यावर समाजाचा फायदा झाला पाहिजे यावरच माझा भर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३० तारखेला रायगडावर
आरक्षण मिळाल्यावर रायगडला जाईल असं म्हटलं होतं. उद्या मी रायगडला जाणार आहे. एक दिवस रायगडला जायला लागेल. ३० जानेवारीला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR