नागपूर : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना ठरल्याचा दावा करणा-या सरकारवर विरोधकांनी मात्र या योजनेवरून टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता नागपूर जिल्ह्याच्या काटोल विधानसभा क्षेत्रात भाजपकडून लावण्यात आलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर काही अज्ञातांनी फाडले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, या योजनेसाठी आजघडीला कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले असून त्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी काटोल, नरखेड परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावले होते.
यावर सरकारचे आभार मानणारा संदेश लिहिला असून समीर उमप यांचा फोटोही त्यावर होता. मात्र विरोधकांनी हे बॅनर रात्रीच्या सुमारास फाडले असल्याचा आरोप उमप यांनी केला आहे. हे कृत्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशाराही समीर उमप यांनी लेखी तक्रारीमध्ये दिला आहे.