जयपूर : राजस्थानमधील दौसा येथे भीषण अपघात झाला आहे. ७० हून अधिक प्रवासी असलेली बस दौसा कलेक्टर सर्कलजवळील रेल्वे रुळावर कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली असून कोतवाली पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हरिद्वारहून जयपूरला जाणारी बस दौसा येथील कलेक्टर चौकात ३० फूट खाली कोसळली. बसमध्ये सुमारे ७०-८० लोक होते. गंभीर जखमी झालेल्या नऊ प्रवाशांना जयपूरला रेफर करण्यात आले. चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांचे मृतदेह दौसा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
माहिती मिळताच दौसाचे जिल्हाधिकारी कमर चौधरी, एडीएम राजकुमार कासवा आणि उपविभागीय अधिकारी संजय गोरा अपघातस्थळी पोहोचले आणि त्यांनी दौसा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती.