नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि तिहार तुरुंगातील अनेक अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. अधिकाऱ्यांवर तुरुंगातील अनेक कैदी आणि गुंड यांच्याकडून पैसे उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सीबीआयने एलजीला पत्र लिहून परवानगी मागितली आहे.
एलजीकडून १० नोव्हेंबर पासून या प्रकरणाचा तपास सुरू करण्याची परवानगी मागितली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी सतेंद्र जैन, तिहारचे तत्कालीन डीजी संदीप गोयल आणि एडीजी मुकेश प्रसाद यांच्यासह तिहारमध्ये खंडणीचे रॅकेट चालवत पैसे उकळत होते, असे या पत्रात म्हटले आहे.
सीबीआयने आरोप केला आहे की, सतेंद्र जैन यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने २०१८ ते २०२१ या काळात सुकेश चंद्र शेखर याच्याकडून १० कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. तिहार तुरुंग क्रमांक ४ चे अधीक्षक राजकुमार जे डीजी गोयल यांच्या जवळचे होते, सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून ते पैसे उकळत होते, त्यांनी पेटीएमद्वारे पैसेही घेतले होते. गोयल आणि मुकेश प्रसाद यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान सुकेश चंद्रशेखर याच्याकडून १२.५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात ते तिहार तुरुंगात कैद्यांना सुविधा देत होते.