39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeनांदेडचव्हाण दाम्पत्याना मराठा आंदोलकांनी रोखले

चव्हाण दाम्पत्याना मराठा आंदोलकांनी रोखले

दोघांनाही करावा लागला नाराजीचा सामना अर्धापुरात २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल

अर्धापूर/नांदेड : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम असून याचा फटका भाजपचे स्टार प्रचारक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी आ. अमिता चव्हाण यांना बसला असून सोमवारी सकाळी खा. अशोक चव्हाण भाजप-महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी कोंढा येथे गेले असता मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण गो बॅक..! अशा घोषणा देऊन वाहनांचा ताफा अडविला. हा रोष पाहून त्यांना माघारी फिरावे लागले. गाड्या परतल्यानंतर त्यावर काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्नही केला. तर दुसरीकडे चव्हाण यांच्या पत्नी माजी आ. अमिता चव्हाण या मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान गेल्या असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आरक्षण मिळेपर्यंत नेत्यानी गावात येऊ नये अशी भूमिका घेतल्याने चव्हाण दाम्पत्याना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाऊन माघारी परतावे लागले.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप-महायुतीचे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी दि. १ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा भाजप खा. अशोक चव्हाण हे कोंढा गावात आले होते. तेथे त्यांना मराठा आंदोलकांसह गावक-यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज बांधवांची बैठक घेऊन प्रत्येकांच्या मताप्रमाणे योग्य उमेदवारांना मतदान करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सुचनेनंतरही मराठा आरक्षण आंदोलनाची धग मात्र कायम आहे. दरम्यान वाहनांचा ताफा माघारी फिरला परंतू मराठा आंदोलकांचा रोष वाढल्याचे पाहून खा. चव्हाण यांना पोलिसांच्या वाहनात सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दरम्यान पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याने २५ ते ३० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळकौठ्यात माजी आ. अमिता चव्हाण यांचा ताफा रोखला
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी व भाजप कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे गेले होते. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा रोखला. दरम्यान पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून अमिता चव्हाण यांना सुखरूप गावाबाहेर काढले. सदर घटनेबाबत वृत्तलिहेपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR