मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. देवेंद्र फडणवीस मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाच्या संदर्भात १० टक्के आरक्षणाचा कायदा तयार करुन आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठा आरक्षणावर भाष्य केले. अजित पवार म्हणाले, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. त्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा त्यात कामाला लागली.
प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय हे लक्षात घेतले पाहीजे. अधिका-यांशी बोलताना चुकीची भाषा वापरली जाते. हे कोण करते. राज्याचे प्रमुख जालन्याला आणि नवी मुंबईला गेले, असे अजित पवार म्हणाले.
काही लोकांनी उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. आज देखील जाणीवपूर्वक काही वक्तव्य केली जातात. उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत शिवराळ भाषा वापरली जाते. हे खपवून घेतले जाईल हा विचार करु नका. यामागे कोण आहे हे शोधावे लागेल कारण एक व्यक्ती एवढे मोठे धाडस करु शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, बिहार सरकारने १० टक्के आरक्षण वाढवले. तसे आपले ५२ + १० असे ६२ टक्के झाले आहे. काही कोटी लोकांचे मत घेऊन हे केले आहे. मागणी केल्यानंतर ती कायद्याच्या चौकटीत कशी बसेल, याची देखील नोंद घ्यावी लागते.