22 C
Latur
Friday, January 30, 2026
Homeसोलापूरविठुनामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमली

विठुनामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमली

माघी एकादशी सोहळा, भूवैकुंठात तीन लाखांवर भाविक, पवित्र स्नानासाठी चंद्रभागेत गर्दी

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपुरात माघी एकादशी सोहळ््यानिमित्त गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी ३ लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले. आज चंद्रभागेत स्नानासाठी वारक-यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे चंद्रभागेचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. त्यामुळे हरिनामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली.

माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मंदिर समितीचे सदस्य हभप शिवाजी महाराज मोरे व प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते पार पडली. माघ यात्रेसाठी गेल्या चार दिवसांपासून पंढरपुरात भाविक दाखल होत होते. गुरुवारी एकादशी सोहळ््यानिमित्त दाखल झालेल्या भाविकांनी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत पवित्र स्रान करण्यासाठी गर्दी केली होती. सर्व संतांच्या पालख्यांनी नगर प्रदक्षिणा केली. टाळ-मृदंगाच्या व हरिनामाच्या गजराने पंढरीनगरी दुमदुमून गेली.

पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीने रिद्धी-सिद्धी गणपती मंदिराजवळ अधिक ८ दर्शन मंडप उभा केले होते. या ठिकाणी भाविकांना चहा, नाश्ता, भोजन याची सुविधा होती. नदीपलीकडील ६५ एकर भक्तीसागर या ठिकाणी प्रशासनाने भाविकांच्या निवासाची सोय केली होती. येथे सुमारे २ लाखाहून अधिक भाविकांच्या मुक्कामाची सोय केली. या ठिकाणी भाविकांना २४ तास पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा देण्यात आली आहे. सोहळ््यानिमित्त आलेल्या भाविकांनी बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली.

कडेकोट बंदोबस्त
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR