छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे यासाठी आज छत्रपती संभाजीनगरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे लोकसभेची उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळणार यावर भाष्य करण्यास तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी टाळल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, शिवसंपर्क अभियान निमित्ताने शनिवारी कन्नड येथील सभेत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा मंत्री संदिपान भुमरे यांनी केला. एकीकडे या जागेवर भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
संभाजीनगरवर भाजपसह शिंदे गटाचा दावा…
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जागेवर भाजपने देखील दावा केला. त्यासाठी, भाजपकडून गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. या मतदारसंघातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे युतीमध्ये ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. एवढेच नाही तर या जागेवर शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार असल्याचा दावा देखील शिंदे गटाचे नेते करत आहेत.