नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत गृह मंत्रालयाने ७ मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या दिवशी सर्व राज्यांमध्ये सायरन वाजतील. यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून सुरक्षा यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढलेला असताना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतली जाणार आहे.
राज्यांतील पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत सुसज्ज राहण्याच्या दृष्टीने ७ मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. नागरी सुरक्षा अभ्यासाचा भाग म्हणून गृह मंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. मॉक ड्रिलवेळी एअर रेड वॉर्निंग सायरन वाजवण्यात येणार आहे. शत्रूच्या हल्ल्यावेळी स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे, याचे प्रशिक्षण सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
मॉक ड्रिलदरम्यान ब्लॅक आऊटची तयारी करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण संस्था आणि कारखाने यांना लवकरात लवकर लपवण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत सुटकेच्या योजना अपडेट करण्याच्या आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
अंतर्गत सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीची तयारी मजबूत करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. पाकिस्तान सोबतचे संबंध ताणले गेलेले असताना गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिलच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
फिरोजपूरमध्ये सराव
पंजाबमधील फिरोजपूर छावणीत ४ मे रोजी ३० मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल पार पडला. रात्री ९ ते ९.३० या वेळेत लाईट बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीतील सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांनी घाबरू नये
ही मॉक ड्रिल पूर्णत: सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावे, याची जाणीव नागरिकांना करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या आधी १९७१ च्या युद्धाआधी मॉक ड्रिल
या आधी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा प्रकारचा मॉक ड्रिल करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच देशपातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थितीचा सराव होणार आहे.