छ. संभाजीनगर : वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. यातच शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण आल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. तर इम्तियाज जलील यांनीही आपण नियमित दानवेंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक वर्षापासून जातो. आमच्यात राजकीय मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असे नाही. या भेटीवरून कोणीही राजकीय अर्थ काढू नये असे जलील म्हणाले.
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून सातत्याने त्यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आणि मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू केल्याचा आरोप सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून केला जातो.