धाराशिव : प्रतिनिधी
ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालिन चेअरमन, व्यवस्थापक, संचालक मंडळ, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी संबंधित संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली नाही. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाने संबंधित आरोपींचे अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वसंतदादा बँकेच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात सोमवारी दि. १५ जानेवारी रोजी वसंतदादा बँकेच्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वसंतदादा बँकेच्या पदाधिकारी व कर्मचा-यांनी पुरेशे तारण न घेता कर्जाचे जवळच्या नातेवाईकांना वाटप केले. वाटप केलेल्या कर्जाची वसुली केली नाही. त्यामुळे रिझर्व बँकेने बँकेचा परवाना रद्द केला. परिणामी मोठ्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. ठेवीदार पतसंस्था असलेल्या प्रभात सहकारी पतपेढीने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै २०२३ रोजी वसंतदादा बँकेचे पदाधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी पोलीसांनी आरोपींना अटक केली नाही. संशयित आरोपींचा जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आरोपी उघडपणे शहरात फिरताना दिसत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर ठेवीदार पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापा-यांच्या सह्या आहेत.