22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील आरोपीचे ब्लड सॅम्पल कच-याच्या डब्यात फेकल्याची चर्चा

पुण्यातील आरोपीचे ब्लड सॅम्पल कच-याच्या डब्यात फेकल्याची चर्चा

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपी असणा-या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणांमधील काही अधिकारी आणि कर्मचारी कशाप्रकारे काम करत होते, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यावेळी या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र, त्याच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी या धनिकपुत्राचे रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता अल्पवयीन आरोपीच्या रक्तात मद्याचे अंश नसल्याची बाब कायदेशीर लढाईत त्याच्या पथ्यावर पडू शकते.

डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ श्रीहरी हळनोर यांनी धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले आणि त्याजागी एका दुस-या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने ठेवून दिले. त्यानंतर धनिकपुत्राच्या रक्ताचे सॅम्पल्स डॉ. हळनोर यानी कच-याच्या डब्यात फेकून दिल्याचे उघड झाले होते. विशाल अग्रवाल यानेही डॉ. अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती फोन कॉल्सच्या डिटेल्समधून समोर आली आहे.

यानंतर आता याप्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे अपघात झाल्यानंतर काहीवेळातच एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला. या आमदारानेच डॉ. अजय तावरे यांना धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यास सांगितले का, अशी चर्चा आता सुरु आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयात मोठ्या पदावर आहेत. ते ससूनमधील प्रतिष्ठित डॉक्टरांपैकी एक आहेत. या सगळ्यानंतर आता डॉ. तावरेंना फोन करणारा आमदार नक्की कोण,याची चर्चा रंगू लागली आहे.

ससून रुग्णालयात डॉक्टरांनी धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल्स बदलण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉ. अजय तावरे यांचे राजकीय लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. डॉ. तावरे यांनी यापूर्वीही ब्लड सॅम्पल्स बदलण्यासारखी कामे केल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले. २९ डिसेंबर २०२३ रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR