छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटातील जिल्ह्यातील नेत्यांचे नाराजी नाट्य काही केल्या संपत नाही. सोमवारी दानवे-खैरे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची संयुक्त बैठक घेऊन कामाला लागले असतानाच माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवणी यांची नाराजी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी राजू वैद्य यांची निवड केल्यामुळे तनवाणी नाराज झाले आहेत. आता तनवाणी यांची नाराजी दूर करण्यासाठी खैरेंना धावपळ करावी लागणार आहे.
दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वाद होता. रविवारी दानवे यांनी खैरेंच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा देत व पेढा भरवत त्यावर पडदा टाकला. लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत ठाकरे गटातील कोण कोण नेते, पदाधिकारी नाराज होतात? हे पहावे लागणार आहे. शिवसेनेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात महानगरप्रमुखपदी राजू वैद्य यांची नियुक्ती केल्यामुळे किशनचंद तनवाणी नाराज झाले आहेत. सोमवारी महाविकास आघाडी पदाधिका-यांच्या बैठकीला त्यांनी दांडी मारत आपली नाराजी दाखवून दिली.
तनवाणी यांची शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधीसोबत जवळीक वाढल्याचे बोलले जाते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील पाच आमदारांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारले. मात्र, पदाधिकारी ठाकरेंसोबत आहेत. महानगरप्रमुख पदावर राजू वैद्य यांची निवड करताना तनवाणी यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला जात आहे.