18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रशैक्षणिक नगरीला ड्रग्जच्या धुराचा ठसका!

शैक्षणिक नगरीला ड्रग्जच्या धुराचा ठसका!

पुणे : प्रतिनिधी
पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण सर्वश्रुत आहे. मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळू लागल्याचे चित्र आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र या शैक्षणिक नगरीला आता ड्रग्जच्या धुराचा ठसका लागला आहे. एक नाही, दोन नाही तर आतापर्यंत तब्बल ४ हजार कोटींचे ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आले. त्यामुळे पुण्याभोवती नशेचा विळखा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अवघ्या चार दिवसांत पुणे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून जप्त केलेल्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची किंमत तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. देशातील विविध शहरात ड्रग्ज रॅकेट चालवणा-या माफियांचे धागेदोरे पुण्याशी संबंधित असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पुण्यात या मेफेड्रॉनच्या विक्रीतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे पोलिसांनी पकडलेल्या मेफेड्रॉनची एकत्रित रक्कम ही पुणे महापालिका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणा-या खर्चाइतकी ठरली आहे. एखाद्या थ्रीलर चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच पुण्याच्या सोमवार पेठेतून उलघडलेले ड्रग्जचे कनेक्शन हे विश्रांतवाडी, कुरकुंभ एमआयडीसी, मुंबई, दिल्ली ते सांगली असे पसरले आहे.

पुण्यातील सोमवार पेठेत मेफेड्रॉनच्या विक्रीसाठी एक ड्रग तस्कर येणार असल्याची खबर पुणे पोलिसांना लागली. पोलिसांनी सापळा रचला आणि ड्रग्जची विक्री करताना वैभव माने, हैदर शेख आणि अजय कारोसिया यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपये किमतीचे एक किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. पण ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचे टोक ठरली. कारण अटक केलेल्या तिघांच्या चौकशीतून पोलिस पुण्यातील विश्रांतवाडी भागात पोहचले आणि इथे मिठाच्या पॅकिंगमध्ये भरून ठेवण्यात आले. या ठिकाणी एकशे दहा कोटी रुपयांचे मेफेड्रॉन आढळून आले.

कुरकुंभमधील या ड्रगच्या कारखान्यातून दिल्लीतही मेफेड्रॉन पाठविण्यात आल्याच समोर आल्यावर पुणे पोलिस दिल्लीत पोहोचले. त्यानंतर दिल्लीतील दोन ठिकाणाहून चौदाशे कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. याच माहितीच्या आधारे सांगलीत छापेमारी करून मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. तसेच साबळेच्या या कंपनीत मेफेड्रॉन तयार करण्याचे काम करणारा युवराज भुजबळ या सायन्टिस्टला अटक करण्यात आली.

मेफेड्रॉन निर्मितीचा एमआयडीसी अड्डा
पुणे पोलिसांचा हा तपास कोटी, दशकोटी आणि त्यानंतर हजार कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनची तस्करी उघड करणारा ठरला. विश्रांतवाडीत सापडलेले मेफेड्रॉन दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम या केमिकल कंपनीत तयार झाल्याचे पोलिसांना समजले. या कंपनीवर छापा टाकला असता आणखी बाराशे कोटी रुपयांचे मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केले आणि अनिल साबळे या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.

मनपाच्या बजेटइतकी उलाढाल
पुणे महापालिकेकडून यावर्षी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ९ हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे. त्यातील कर्मचा-यांच्या वेतनावरील रक्कम वगळून पुणे महापालिका ४ हजार कोटी रुपये शहरातील वेगवेगळ््या सुविधांवर खर्च करते. जवळपास तेवढ्याच रक्कमेची उलाढाल पुण्यातील मेफेड्रॉन तयार करणारे कारखाने आणि त्यांची विक्री करणारे कारखाने करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR